एसआयआर मोहिमेत किन्ही गावाची दमदार कामगिरी; १०० टक्के मतदार पुनरिक्षण पूर्ण करून तालुक्यात प्रथम क्रमांक

भुसावळ (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) आणि बूथ सक्षमीकरण मोहिमेत भुसावळ तालुक्यातील किन्ही गावाने उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण भागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गावातील तिन्ही मतदान केंद्रांचे १०० टक्के मतदार पुनरिक्षण, डिजिटल मॅपिंग, प्रपत्र भरणे तसेच निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सर्वप्रथम पूर्ण करण्यात आले आहे.

या यशाबद्दल राज्याचे मंत्री तथा भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी किन्ही गावातील तिन्ही बीएलओंचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.

एसआयआर मोहिमेअंतर्गत किन्ही गावातील प्रत्येक मतदाराची गृहभेट घेऊन पडताळणी करण्यात आली. अनमॅप मतदारांची नोंद, नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील माहितीचे डिजिटल पद्धतीने अद्ययावतीकरण करण्यात आले. हे संपूर्ण काम नियोजनबद्ध पद्धतीने वेळेआधी पूर्ण करण्यात आले.

यादी भाग क्रमांक २६३ मध्ये ९५२ लोकसंख्येचे अचूक पुनरिक्षण व डिजिटल मॅपिंग करत बीएलओ ओंकार एकनाथ पाटील यांनी आपले मतदान केंद्र १०० टक्के पूर्ण केले. यादी भाग क्रमांक २६४ मध्ये ८५९ लोकसंख्येचे काम बीएलओ गिरीश ज्ञानदेव चौधरी यांनी उत्कृष्टरीत्या पूर्ण केले. तर यादी भाग क्रमांक २६५ मध्ये ८९९ लोकसंख्येच्या मतदार यादीचे तांत्रिक अचूकतेने पुनरिक्षण करत बीएलओ रुपेश सुनील नेहेते यांनीही आपले बूथ अव्वल ठरवले.

या तिन्ही मतदान केंद्रांमध्ये मिळून एकूण २ हजार ७१० लोकसंख्येची गृहभेटीद्वारे पडताळणी, अनमॅप मतदारांचे पुनरिक्षण आणि नवीन मतदार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले.

मंत्री संजय सावकारे यांनी बीएलओ ओंकार पाटील, गिरीश चौधरी आणि रुपेश नेहेते यांच्या कार्याचे कौतुक करत, “या तिन्ही कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत राष्ट्रीय महत्त्वाचे काम वेळेआधी पूर्ण केले आहे. तालुक्यातील इतर बूथ प्रमुख व बीएलओंनीही किन्ही गावाचा आदर्श घेऊन आपले काम लवकरात लवकर पूर्ण करावे,” असे आवाहन केले.

या मोहिमेत बीएलओंसोबत सचिन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कडू सुरवाडे, शक्ती केंद्रप्रमुख कृणाल येवले, पोलीस पाटील राजू तायडे तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहकार्य केले.

दरम्यान, भुसावळ विधानसभा क्षेत्रातील सर्वोदय हायस्कूल, किन्ही यांच्या कार्यक्षेत्रानेही एसआयआर मोहिमेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. किन्ही गावाच्या या कामगिरीचे तालुकाभर कौतुक होत असून लोकशाही प्रक्रियेला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.