भुसावळ (प्रतिनिधी ) : परिसरात चांगला पाऊस पडावा, वरुणराजा प्रसन्न व्हावा आणि शेतकरी राजा तसेच पृथ्वीवरील सर्व जीवांना पाण्याचा लाभ मिळावा, या उदात्त हेतूने श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे भुसावळ येथे ‘धोंडी’ यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली.
शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता अष्टभुजा मंदिरापासून या प्रभात फेरीला व धोंडी यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी कडुनिंबाच्या पाल्याचा पारंपरिक पेहराव परिधान केला होता. वाजत-गाजत निघालेल्या या धोंडीचे शहरातील विविध भागांत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

यावेळी गल्लीतील नागरिकांनी धोंडीवर पाणी टाकून इंद्रदेव, वरुणदेव, झुलेलाल देव तसेच सर्व देवी-देवतांनी प्रसन्न होऊन परिसरात चांगला पाऊस पाडावा, अशी मनोभावे प्रार्थना केली. पाऊस पडल्यामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना जीवन मिळावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अष्टभुजा मंदिर येथून निघालेली धोंडी यात्रा बद्री प्लॉट, गायत्री शक्तीपीठ–तुळसी नगर, नंदनवन कॉलनी, ओमप्रकाश चौधरी हॉस्पिटल, कन्हैयालाल प्लॉट क्रमांक २ या मार्गाने मार्गक्रमण करून पुन्हा अष्टभुजा मंदिराजवळ आली. तेथे यात्रेचा समारोप करण्यात आला.
अतिशय उत्साही, पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात ही यात्रा संपन्न झाली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीही धोंडी यात्रेचे जागोजागी स्वागत करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.
धोंडी यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, जे. बी. कोटेचा, महेश भालेराव, सुभाष शिरसाठ, किरण कोल्हे, श्याम अग्रवाल, जी. आर. ठाकूर, मदन बोरकर, पिंटू हेडा, बंडू हेडा, नरेंद्र लड्डा, श्याम काबरा, महेश पाटील, गोपाळ जांगीड तसेच प्रभात फेरीतील सर्व बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन - भुसावळ येथे श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे धोंडी यात्रा काढण्यात आली या वेळी राधेश्याम लाहोटी,संजय अग्रवाल,जे.बी. कोटेचा,महेश भालेराव,सुभाष शिरसाठ,किरण कोल्हे,श्याम अग्रवाल, जि.आर.ठाकूर,मदन बोरकर,बंडू हेडा व सदस्य पाण्यात धोंडी धोंडी पाणी दे अशा घोषणा देण्यात आल्या.


