प्रभाग क्रमांक २० मधील २९ विकासकामांना अद्याप मंजुरी नाही; अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांची नाराजी : पालिकेच्या सभेत ३०० विषयांना मंजुरी; मात्र प्रभाग २० मधील प्रस्तावांवर निर्णय न झाल्याचा आरोप ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) - भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील विविध विकासकामांसाठी अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी सादर केलेल्या २९ प्रस्तावांना अद्याप मंजुरी न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांच्या मंजुरीत होत असलेल्या विलंबामुळे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अलीकडेच झालेल्या भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर सुमारे ३०० विषय होते. या सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र, अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी प्रभाग क्रमांक २० मधील विकासकामांसाठी सादर केलेल्या २९ प्रस्तावांवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रभागातील कामे रखडली

राज चौधरी यांनी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रीटीकरण, नाल्यांची उभारणी, एलईडी पथदिवे, स्वच्छता, सुशोभीकरण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक विविध कामांचा समावेश आहे. ही कामे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असून, त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

“ही कामे माझ्यासाठी नव्हती, तर प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी होती. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे प्रस्ताव सादर केले होते. मात्र, अद्याप मंजुरी न मिळाल्याने विकासकामे रखडली असून नागरिकांची गैरसोय होत आहे,” असे नगरसेवक राज चौधरी यांनी सांगितले.

प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रभाग क्रमांक २० मधील सर्व २९ प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी आणि रखडलेली विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी केली.