भुसावळ ( प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील घरकुल व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांमध्ये होत असलेला विलंब, लाभार्थ्यांची होत असलेली हेलपाटे आणि पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कथित हलगर्जीपणा याविरोधात शुक्रवारी युवासेनेच्या वतीने भुसावळ पंचायत समितीवर जोरदार मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख विष्णू राणे, तालुकाध्यक्ष निलेश ठाकूर, ज्येष्ठ नेते विलास मुळे, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, सुरेश चौधरी, प्रकाश निकम, विश्वजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते व लाभार्थी मोर्चात सहभागी झाले. मोर्चादरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर सहायक अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. युवासेनेने दिलेल्या निवेदनात पंचायत समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध असतानाही लाभार्थ्यांचे हप्ते महिनोनमहिने का प्रलंबित ठेवले जात आहेत, अर्ज करूनही त्यावर वेळेत उत्तर का दिले जात नाही, तसेच नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा मारायला का लावल्या जात आहेत, याचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. याशिवाय, मनरेगा अंतर्गत गोठे, विहिरी, कांदा चाळ, फळबाग यासारख्या कामांना अनावश्यक विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला. रोजगार हमी योजनेचे हप्ते मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याबाबतही प्रशासनाने सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांचे जीओ-टॅगिंगसाठी फोटो काढण्याच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्याचाही गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला. तसेच केवायसीसाठी गरीब नागरिकांना दहा-दहा वेळा पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने प्रशासनाने एकदाच प्रक्रिया पूर्ण होईल अशी प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. युवासेनेने निवेदनात स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, घरकुल व रोजगार हमी योजनांबाबत नागरिकांची दिशाभूल तातडीने थांबवावी, कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात आणि सर्व प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना आपल्या खास शैलीत तीव्र आंदोलन छेडेल. यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले, गरीबांच्या हक्काच्या योजना कागदावर ठेवून चालणार नाही. प्रशासनाने नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. या निवेदनावर युवा सेना तालुकाप्रमुख विष्णू राजेंद्र राणे, राजू काठोके, किरण मंडवाले, अक्षय बेंडाळे, विनोद झोपे, अॅड. किशोर मोहन खलसे, मनोज जाधव, निलेश रामचंद्र पाटील, लक्ष्मण राजपूत, हेमराज राजपूत, दिनेश राजपूत, मनोज कोळी, लहू कोळी, उमेश शेळके, बबलू धनगर, शाम फुलगावकर, पी.टी. पाटील, नंदा प्रकाश निकम (जिल्हा संघटक महिला), मनीषा विजय पाटील (जिल्हा उपसंघटक) आदींच्या सह्या आहेत.


