भुसावळ (प्रतिनिधी)-: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात विविध पक्षांच्या समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत तसेच समाजात फूट पाडण्याच्या कथित कटकारस्थानाचा निषेध करण्यासाठी २२ जुलै रोजी नाहाटा चौफुली येथून भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालात राज्यांना अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही राज्यांनी या संदर्भात पावले उचलली असून महाराष्ट्रातही त्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. बैठकीत उपस्थितांनी आरोप केला की, विशेषतः मांग आणि पूर्वाश्रमीचे महार समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह व अप्रमाणित संदेश प्रसारित केले जात आहेत. अशा संदेशांमुळे सामाजिक सौहार्द बिघडू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी नागरिकांना कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले. अफवा, दिशाभूल करणारे संदेश आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टपासून दूर राहण्याचेही आवाहन करण्यात आले. बैठकीत २२ जुलै रोजी नाहाटा चौफुली येथून निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


