.. अखेर हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी बुजला सुनसगाव – नशिराबाद पुलावरील जिवघेणा खड्डा !

भुसावळ (प्रतिनिधी)- 
 सुनसगाव – नशिराबाद - सुनसगाव मार्गावरील वाघुर नदीच्या पुलावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. सुनसगाव नशिराबाद पुलावर जिवघेणा खड्डा बुजविण्याची मागणी केली होती.विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नव्हती आणि अपघाताची शक्यता अधिकच वाढली होती. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक दिवसांपासून या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले जात असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखत सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेना योजनेच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत पुढाकार घेतला.
विद्यालयाचे चेअरमन आर. डी. पाटील सर, मुख्याध्यापक जे. पी. सपकाळे सर तसेच हरित सेना प्रमुख एन. बी. चौधरी सर , श्री राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या धोकादायक खड्ड्यांविषयी संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांनी केवळ समस्या मांडून थांबण्याऐवजी ती सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांचे प्रयत्न अखेर यशस्वी ठरले.
शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी वाघुर नदी पुलावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासन जिथे या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती, तिथे हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेली सामाजिक जाणीव, जागरूकता आणि लोकहिताची भावना प्रेरणादायी ठरली आहे.
पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक प्रश्नांबाबतही राष्ट्रीय हरित सेना सक्रियपणे काम करत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. समाजातील समस्यांकडे केवळ बोट न दाखवता त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा आदर्श या विद्यार्थ्यांनी निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या हरित सेनेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच मार्गदर्शकांचे सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.