भुसावळ (12 जुलै) : प्रभाग क्रमांक 14 मधील विकासकामे सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नसल्याचा नगरसेविका सुभद्रा गुंजाळ यांचा दावा तथ्यहीन असून त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी पत्रक काढल्याचा आरोप भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी केला आहे. लोणारी म्हणाले की, 16 जुलैच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात प्रभाग क्रमांक 14 मधील आठ विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अजेंडा व्यवस्थित न वाचताच आरोप करण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी संपूर्ण शहरातील सर्व प्रभागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. काही कामे राहिली असतील तर ती पुढील बैठकीत घेता येतील. प्रभागाच्या विकासासाठी वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून नगराध्यक्षांशी चर्चा करणे आवश्यक आहे. नगरसेविका गुंजाळ यांचे आरोप वस्तुस्थितीपासून दूर असून केवळ प्रसिद्धी मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.


