भुसावळ गोळीबार प्रकरण : दोन आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलिसांकडून धिंड; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील जुन्या रेल्वे परिसरात व्यवसायाच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली. कायद्याचा धाक निर्माण करणे आणि गुन्हेगारांचे मनोबल खच्ची करणे या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केली.

सोमवारी रात्री राहुल परिसरात रेल्वेसंबंधी जुन्या वादातून अमोल विनोद देवरे (रा. रमाबाई आंबेडकर नगर) आणि अनिकेत उर्फ कालू मनोज जाधव (रा. वाल्मीकनगर, भुसावळ) यांनी धर्मसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित यांच्यावर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. मात्र निशाणा चुकल्याने धर्मसिंग पंडित यांचा जीव थोडक्यात बचावला.

या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला. मंगळवारी दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना पुन्हा घटनास्थळी नेऊन भररस्त्यातून धिंड काढत गुन्ह्याची पुनर्रचना केली. या कारवाईद्वारे गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखविण्याचा आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा संदेश पोलिसांनी दिला.

दरम्यान, बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अमोल विनोद देवरे आणि अनिकेत उर्फ कालू मनोज जाधव यांना १० जुलैपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणात आरोपींकडून अधिक चौकशी करून गोळीबारामागील नेमका हेतू, वापरण्यात आलेल्या शस्त्राचा स्त्रोत तसेच इतर संबंधित बाबींचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.