भुसावळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत 28 जून ते 4 जुलै 2026 या कालावधीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला ओरल पोलिओ लस (ओपीव्ही) देऊन भारताला पोलिओमुक्त राखण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांना बळकटी देण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेचा शुभारंभ 28 जून रोजी विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ येथे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवकुमार सी. एरप्पा यांच्या हस्ते बालकांना पोलिओची मात्रा पाजून करण्यात आला. यावेळी डॉ. रेश्मी जी. (डीएमओ), डॉ. तालीब पटेल (बालरोग तज्ज्ञ) यांच्यासह वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोहिमेअंतर्गत विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ तसेच विविध रेल्वे आणि गैर-रेल्वे पल्स पोलिओ केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येत आहे. याशिवाय वैद्यकीय पथकांकडून रेल्वे स्थानके, आरोग्य केंद्रे आणि विविध भागांमध्ये भेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी, 28 जून रोजी एकूण 1,020 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली. त्यापैकी 394 रेल्वे लाभार्थी तर 626 गैर-रेल्वे लाभार्थी होते. ही मोहीम 4 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला या मोहिमेदरम्यान पोलिओची मात्रा अवश्य पाजावी आणि निरोगी, सुरक्षित तसेच पोलिओमुक्त भारताच्या निर्मितीत आपले सक्रिय योगदान द्यावे. असे आवाहन मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने सर्व रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि नागरिकांना आवाहन केले आहे



