पाचोऱ्यात भीषण आग! शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक बाईक शोरूम जळून खाक; १२ लाखांचे नुकसान…!

पाचोरा (प्रतिनिधी ) - शहरातील जुन्या सारोळा रस्त्यावर असलेल्या ए.पी.ई. बाईक अँड ऑटो पार्ट सर्विस या इलेक्ट्रिक बाईक विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागून तब्बल १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता दुकानातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानाला वेढा घातला. आगीची तीव्रता इतकी होती की, दुकानातील ५ लाख रुपयांचे स्पेअर पार्ट्स आणि ७ लाख रुपये किमतीच्या १४ इलेक्ट्रिक मोटारसायकली जळून पूर्णपणे खाक झाल्या.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी आबा पाटील आणि अनिल बागुल यांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दुकानातील बहुतांश साहित्य जळून राख झाले होते.

या प्रकरणी अनिकेत अनिल पाटील (वय २६) यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड करीत आहेत. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून, नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.