पालकांचा मुलांशी सकारात्मक संवाद म्हणजेच सुजाण पालकत्व – डॉ. संगीता महाजन

जळगाव (प्रतिनिधी ) - मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी प्रेम, समजूतदारपणा व सकारात्मक संवाद आवश्यक आहे. मुलांच्या भावनांना समजून घेत त्यांना विश्वासाचे वातावरण देणे, त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देणे आणि प्रत्येक मुलाची वैयक्तिक क्षमता ओळखून त्यानुसार संगोपन करणे, हीच सुजाण पालकत्वाची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता डॉ. संगीता महाजन यांनी केले.

जळगाव येथील अमृत प्री-स्कूलमध्ये पालकांसाठी बालमानसशास्त्र व सुजाण पालकत्व या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी शाळेचे चेअरमन धनंजय अमृतकर, प्राचार्या सौ. पूजा अमृतकर उपस्थित होत्या. डॉ. महाजन यांनी बालमानसशास्त्राच्या विविध पैलूंवर सखोल विवेचन केले. त्यांनी पालकांना मुलांच्या मानसिक, भावनिक व सामाजिक विकासाची प्रक्रिया समजावून सांगत, मुलांशी सकारात्मक संवाद कसा साधावा, त्यांच्या भावना कशा ओळखाव्यात व समजून घ्याव्यात, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी कोणती भूमिका पार पाडावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुलांना योग्य संस्कार, प्रोत्साहन आणि प्रेमळ वातावरण मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून ते जीवनात यशस्वी होण्याचा भक्कम पाया तयार होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे पालकांना आपल्या पाल्यांची अधिक परिणामकारकपणे काळजी घेण्यासाठी उपयुक्त व व्यवहार्य माहिती मिळाली. कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पूजा पाटील यांनी प्रभावीपणे केले. शाळेच्या प्रशासकीय विभागातील दिव्या पाटील यांनी संगणकीय व तांत्रिक व्यवस्था यशस्वीरित्या हाताळली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.