भुसावळ स्थानकाच्या उत्तर दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचा एक भाग विघटन कार्यासाठी बंद

रेल्वे प्रशासनाचे आवाहन : प्रवाशांनी नवीन पादचारी पुलाचा वापर करावा

भुसावळ (प्रतिनिधी) - 
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच स्थानकावरील प्रवासी सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेकडील जुन्या पादचारी पुलाच्या (FOB) प्लॅटफॉर्म क्रमांक ५ व ६ जवळील संरचनेचे विघटन (डिस्मँटलिंग) कार्य रेल्वे प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले आहे.

सदर विघटन कार्य दिनांक २३ जून २०२६ पासून सुरू करण्यात येणार असून, कार्यकाळात जुन्या पादचारी पुलाचा संबंधित भाग प्रवाशांसाठी बंद राहील.

जुन्या पादचारी पुलाची ही संरचना हटवून त्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि उत्तम प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी तसेच स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्थानकावरील नवीन पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. उत्तर दिशेला प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध राहील; मात्र एस्केलेटरची सुविधा तात्पुरती उपलब्ध राहणार नाही. दक्षिण दिशेकडील पादचारी पुलावर लिफ्ट व एस्केलेटरसह सर्व प्रवासी सुविधा पूर्ववत उपलब्ध राहतील.

प्रवाशांच्या सुविधा व सुरक्षिततेचा विचार करून प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ वर जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी प्रवाशांनी दक्षिण दिशेकडील खंडवा बाजूस असलेल्या नवीन पादचारी पुलाचा वापर करावा. प्लॅटफॉर्म क्रमांक ७/८ तसेच स्थानकाच्या उत्तर दिशेला ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई बाजूस असलेला पादचारी पूल उपलब्ध राहील. याशिवाय, उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे तसेच सर्व प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठीही प्रवाशांनी मुंबई बाजूस असलेल्या पादचारी पुलाचाच वापर करावा.

रेल्वे प्रशासनामार्फत हे कार्य संपूर्ण सुरक्षितता आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत असून, प्रवाशांना होणारी गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या कालावधीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.