भुसावळ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०२६ रोजी एपीएस फिटनेस, भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. कमल गणपती हॉल येथे सकाळी ६ वाजता झालेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी एपीएस फिटनेसच्या पारुल वर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, "योग म्हणजे स्वतःचा, स्वतःद्वारे, स्वतःकडे जाणारा प्रवास" असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी योगामुळे शरीराची लवचिकता आणि ताकद वाढते, ताणतणाव व चिंता कमी होतात, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्ती बळकट होऊन मानसिक शांतता व सजगता प्राप्त होते, असे सांगितले
.शिबिरादरम्यान विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमात पारुल वर्मा यांच्यासह कमल गणपती हॉलच्या मालक श्वेता चव्हाण, भावना झा, सोमा बापारी, सुनीता सिंग, दीप्ती सिंग, सविता घेटे, प्रमिला आणि संगीता संगवार यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.