रेल्वेत भुसावळच्या महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे महिला चोरट्यास अटक

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण असताना रेल्वे पोलिसांनी तत्पर तपास करून एका महिला चोरट्याला अटक केली आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर तपोवन एक्सप्रेसमध्ये चढताना भुसावळ येथील महिलेचे सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी एका महिलेला अटक करून तिच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ जून रोजी अपर्णा श्रीगोंदेकर (रा. भुसावळ) या तपोवन एक्सप्रेसने नांदेड येथे जाण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकावर आल्या होत्या. रेल्वेत चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील सोन्याचे गंठण ठेवलेली छोटी पर्स लंपास केली. याबाबत त्यांनी नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तपणे तपास सुरू केला. स्थानक व परिसरातील सुमारे १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यातून संशयित महिलेची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या संशयीत महिला आरोपीचे नाव लक्ष्मी गणेश सखरे (वय ४७) असे असून ती मूळची अण्णा नगर, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. सध्या ती दहावा मैल, ओझर (नाशिक) येथे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफ निरीक्षक नवीन सिंग, गुन्हे शोध पथक प्रमुख संतोष उफाडे पाटील तसेच गोविंद दाभाडे, शैलेश पाटील, सचिन दैवे, सुभाष काळे, सागर वर्मा, नितीन मिस्त्री आणि केवल झाल्टे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.