भुसावळात सावकारी परवान्यासाठी ३० हजारांची लाच घेताना दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; सहकार अधिकारी फरार

भुसावळ (प्रतिनिधी) : सावकारी व्यवसायाचा परवाना (लायसन्स) मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार विभागातील दोन प्रमाणित लेखापरीक्षकांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. मात्र या प्रकरणातील वर्ग-३ चे सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड यांना सापळ्याची कुणकुण लागताच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेश जनार्दन विसपुते (वय ६२, माऊलीनगर, रेणुका माता मंदिराजवळ, राजस्थान मार्बलमागे, भुसावळ) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०, विवेकानंद नगर, जिल्हापेठ, जळगाव) यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी परवाना प्राप्त करायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर संशयितांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सोमवारी (दि. १५) सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे दोन्ही लेखापरीक्षक भुसावळातील नाहाटा चौफुली परिसरात दुपारी सुमारे चार वाजता लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आले. तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले. दरम्यान, सहकार अधिकारी विजय गरूड हे कारवाईची माहिती मिळताच घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, प्रणेश ठाकूर, बाळू मराठे आणि सहकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत असून फरार सहकार अधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. या कारवाईमुळे भुसावळसह जिल्ह्यातील सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे.