भुसावळ विभागात पेन्शन अदालत यशस्वी; 97 प्रकरणांचा निपटारा, 31लाख 59 हजारांचे वितरण

भुसावळ (प्रतिनिधी) , दि. 15 जून — मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात कृष्णचंद्र सभागृह येथे सोमवारी पेन्शन अदालतचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अदालतमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी व कौटुंबिक पेन्शनधारकांनी सादर केलेल्या विविध समस्या व तक्रारींची सुनावणी करून त्यांचे तातडीने निराकरण करण्यात आले. प्राप्त झालेल्या एकूण 97 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून विविध देयकांशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना 31 लाख 59 हजार 408 रुपयांची रक्कम अदा करण्यात आली.

पेन्शन अदालत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सेवानिवृत्त कर्मचारी व पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत रेल्वे प्रशासन पेन्शनधारकांच्या समस्या त्वरित, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्व प्रकरणांचा संवेदनशीलतेने आणि नियमानुसार निपटारा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्तम आरोग्य, सन्मानपूर्ण आणि दीर्घायुषी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांनीही पेन्शनधारकांच्या तक्रारींच्या प्रभावी निराकरणासाठी प्रशासनाची बांधिलकी अधोरेखित केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी दिलीप रं. खरात यांनी केली. त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या निरोगी व सुखी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्मिक अधिकारी सुरेंद्र जे. हिवाळे यांनी केले.

या पेन्शन अदालतमध्ये पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्मिक, लेखा, निपटारा, कल्याण, अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार तसेच विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय सहकार्य लाभले.

मध्य रेल्वे भुसावळ विभागामार्फत आयोजित करण्यात आलेली ही पेन्शन अदालत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविणे आणि त्यांच्या कल्याणासाठी रेल्वे प्रशासनाच्या संवेदनशील व सकारात्मक कार्यपद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.