विद्यार्थी सुरक्षा अभियानांतर्गत भुसावळमध्ये दामिनी पथक अ‍ॅक्शन मोडवर; टवाळखोरांवर पोलिसांची करडी नजर :

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या ‘विद्यार्थी सुरक्षा अभियान’ अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने विशेष मोहीम राबविली. ही मोहीम पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच बसस्थानक परिसराला भेटी दिल्या. यावेळी या पथकाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक भारती काळे व त्यांच्या पथकाने शाळा-महाविद्यालय परिसरात उपस्थित राहून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला.

शाळा व महाविद्यालय परिसरात वावरणाऱ्या टवाळखोर व समाजकंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष गस्त घालण्यात आली. विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक, तक्रार निवारण व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करून शिक्षणासाठी सुरक्षित, सकारात्मक आणि निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे जळगाव जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.