भुसावळ (प्रतिनिधी ) – शहराला यावल व रावेर तालुक्यांशी जोडणारा तापी नदीवरील महत्त्वाचा पूल सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात वाहनचालकांना पूल नेमका कुठून सुरू होतो आणि रस्ता कुठे संपतो हे स्पष्ट न दिसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहेतब्बल ९०० मीटर लांबीच्या या पुलाच्या यावल बाजूकडील टोकाला रस्ता आणि पुलाच्या सांध्यावर कोणतेही संरक्षक कठडे नसल्याचे दिसून येते. नियमानुसार पुलाच्या दोन्ही बाजूंना किमान २०० मीटरपर्यंत सुरक्षा कठडे उभारणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मीटरभरही कठडा नसल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यासोबतच पुलावर रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना आणि रंगरंगोटी यांचाही पूर्ण अभाव असल्याने रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनत असून वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.“रात्री यावल-रावेर भागातून येताना पूल कुठून सुरू होतो हेच लक्षात येत नाही. अंधारात सरळ नदीत जाण्याची भीती वाटते. प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात,” अशी प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नियमाप्रमाणे पुलाच्या दोन्ही बाजूंना २०० मीटरपर्यंत कठडे असणे बंधनकारक आहे. येथे मात्र सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हा पूल आणि संबंधित रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता चंद्रशेखर तायडे यांनी दिली. त्यामुळे पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित विभागाचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात नाशिक येथील स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता इमरान शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
स्थानिक नागरिकांनी पुलावर तातडीने मजबूत कठडे उभारणे, रिफ्लेक्टर व इशारा फलक बसविणे तसेच रंगरंगोटी व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.


