भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ आगारातून सुटणारी वराडसिम-चोरवड-गोजोरा-सुनसगाव-बेलव्हाळ मार्गावरील एसटी बस सेवा विद्यार्थ्यांना सुट्टी लागल्याचे कारण देत बंद करण्यात आली होती. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच आबालवृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. शासनाच्या महिला अर्धे तिकीट व ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास योजनेचाही लाभ या भागातील नागरिकांना मिळत नव्हता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत एसटी प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले. तालुकाध्यक्ष विलास पाटील, युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, विकासो सदस्य विजयसिंग पाटील, गोजोरा येथील सरपंचपती लक्ष्मण कोळी व उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष तथा रावेर लोकसभा प्रमुख उमेश भाऊ नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग व्यवस्थापकांकडे मागणी केली.
निवेदनात महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच शासनाच्या विविध प्रवास योजनांपासून नागरिकांना वंचित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, प्रसारमाध्यमांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याने एसटी महामंडळाने तातडीने दखल घेत बंद असलेली भुसावळ-गोजोरा-वराडसिम बस सेवा पुन्हा सुरळीत सुरू केली आहे.
याबाबत समाधान व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी एसटी महामंडळ तसेच प्रसारमाध्यमांचे आभार मानले. याचबरोबर भुसावळ-सुनसगाव, बेलव्हाळ आणि गोंभी मार्गावरील एसटी बसेसदेखील तातडीने नियमित सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.


