जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देताना भारतीय हवामान विभागाने ३ ते ६ मे दरम्यान हवामानात अचानक बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेल्या हवामान बुलेटिननुसार, ३ मे रोजी बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. ४ मे रोजी विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोरडे हवामान राहील. ५ आणि ६ मे दरम्यान विदर्भ व मराठवाड्यात पुन्हा तुरळक पावसाचा अंदाज असून, इतर भागात हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
मात्र, जळगाव जिल्ह्यात ३ ते ६ मेदरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता कायम असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


