महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान? पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीवर निष्काळजीपणाचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. १ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण पार पडले; मात्र सूर्यास्तानंतरही राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला होता. दिवसभर विविध कार्यक्रम सुरू असतानाही संध्याकाळी नियमानुसार ध्वज उतरवण्याची जबाबदारी पार पाडली गेली नाही. परिणामी, राष्ट्रध्वज रात्रीपर्यंत तसाच फडकत राहिल्याचे समोर आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, रात्री सुमारे ९.३० वाजता घाईगडबडीत ध्वज उतरवण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य व युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विष्णू राणे हे त्या दिवशी बाहेरगावी होते. रात्री गावात परतल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहताच संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र “आम्ही गावाबाहेर आहोत,” असे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राणे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन व्हिडिओ चित्रीकरण केले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. “राष्ट्रध्वज हा देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “राष्ट्रीय प्रतीकांबाबतची अशी निष्काळजीपणा असह्य आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

नियमांनुसार, राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच फडकवला जातो. विशेष प्रसंगी रात्री ध्वज ठेवायचा असल्यास योग्य प्रकाशव्यवस्था असणे आवश्यक असते. त्यामुळे या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी होणे आवश्यक ठरत आहे.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी “या प्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झाली असून ती गटविकास अधिकारी, भुसावळ यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. पुढील कारवाई त्यांच्या अहवालानुसार केली जाईल,” असे सांगितले.
तसेच पंचायत समिती, भुसावळचे गटविकास अधिकारी यांनी “तक्रार प्राप्त झाली असून संबंधितांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,” अशी माहिती दिली.

या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.