जळगावमध्ये ‘आपले सरकार सेवा सेतु’ पोर्टल बंद; नागरिकांची गैरसोय, कारवाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) -: जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा सेतु’ (महा ई-सेवा) पोर्टल मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विविध शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे शालेय काम ठप्प झाले आहे.

सदर पोर्टल हे महाआयटी कंपनी लिमिटेडद्वारे चालविले जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे सेवा बंद आहे. मात्र, यामुळे नागरिकांची अडचण वाढली असून दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

या संदर्भात अनेक नागरिक व विद्यार्थ्यांनी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सानप यांनी जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला. संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी तसेच बंद असलेले पोर्टल तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.