वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करा – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) – “पृथ्वीवरील निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेत संकल्प करावा,” असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी वसुंधरा दिनानिमित्त केले आहे.

दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य देणारी पृथ्वी तसेच तिच्यावरची संपूर्ण जीवसृष्टी यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून नैसर्गिक साधनसंपत्ती झपाट्याने कमी होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. पाटील यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना त्या तुलनेत वृक्षलागवड होत नाही. जंगलातील पाणी व वनसंपत्ती घटल्याने वन्यप्राणी शेतीकडे वळत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे तापमानवाढ, अवकाळी पाऊस, ढगफुटीसारख्या घटना आणि पूरस्थिती निर्माण होत आहे. तसेच कोरोना सारख्या गंभीर आजारांचेही संकट मानवजातीसमोर उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर वसुंधरा दिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा, तसेच वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

“आजपासूनच आपण सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलत पृथ्वीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे,” असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.