भुसावळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधनपर कीर्तन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील रिंगरोड परिसरात प्रबोधनपर कीर्तन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उत्तर एरिया वार्ड, धम्म बंधू व धम्म भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रबोधनकार तथा कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य आणि सप्त खंजेरी वादक इंजिनियर पवन महाराज दवंडे यांनी प्रभावी कीर्तन सादर केले. आपल्या कीर्तनातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले तसेच बसवेश्वर महाराज यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेषतः डॉ. आंबेडकर यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि समाजपरिवर्तनातील त्यांची भूमिका यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सुवर्णा गाढेकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच बाबासाहेबांची जयंती १३८ देशांत साजरी केली जाते, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कामगारांसाठी करण्यात आलेल्या फॅक्टरी ॲक्ट संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयाचे प्रवीण सपकाळे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख सल्लागार डॉ. आर. पी. तायडे, सचिव के. बी. सपकाळे, उपाध्यक्ष देवानंद इंगळे, सदस्य सुरेंद्र कोल्हेकर, कोषाध्यक्ष यु. एम. जगताप तसेच ऑडिटर के. वी. खैरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.