भुसावळ (प्रतिनिधी )) – शहरातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. आज १८ एप्रिल रोजी भुसावळ येथे मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत शुक्रवार रोजी जळगाव येथे गायत्री भंगाळे यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करण्यात आले.

भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितले की, गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र सध्या पडताळणी समितीकडे अंतिम टप्प्यात असून, त्या प्रक्रियेत मंत्री सावकारे कोणताही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. तसेच भंगाळे या कुरमी ओबीसी प्रवर्गातील असल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची जात प्रमाणपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली.
दरम्यान, मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षा भंगाळे यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. भंगाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेली तक्रार नियमबाह्य असल्याचाही दावा करण्यात आला.
गायत्री भंगाळे यांनी काल केलेल्या आरोपांमध्ये भुसावळच्या पाणीपुरवठा योजनेत अडथळे निर्माण होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे म्हटले होते. मात्र, हा आरोपही भाजपकडून फेटाळण्यात आला आहे.
युवराज लोणारी यांनी पुढे सांगितले की, येत्या काही दिवसांत जात पडताळणी समितीचा अंतिम निर्णय येणार असून सत्य लवकरच समोर येईल. त्यांनी असा आरोपही केला की, आवश्यक कालावधीत जात पडताळणी पूर्ण न झाल्याने भंगाळे यांना त्यांचा दावा सिद्ध करता येणार नाही.
या प्रकरणात भंगाळे यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रात फेरफार झाल्याचा आरोपही करण्यात आला. नगरसेवक निक्की बत्रा यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कागदपत्रे सादर करत त्यात खाडाखोड झाल्याचे दाखवले. तसेच निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाची दिशाभूल झाल्याचा दावा करण्यात आला.
याशिवाय, नगरपरिषदेच्या फॉर्म क्रमांक ४३ मधील नोंदींमध्येही चुकीचे जात उल्लेख करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर कारवाई होऊन त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही युवराज लोणारी यांनी दिला.
दरम्यान, नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सांगितले की, भुसावळ नगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपचे चार नगरसेवक निवडून आले असून, सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचे काम भाजपने केले आहे.
या सर्व घडामोडींमुळे भुसावळचे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून, जात पडताळणी समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


