ध्वनीप्रदूषण टाळून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या सामाजिक देखाव्यांवर भर द्या – केदार बारबोले: आंबेडकर जयंती उत्सवासाठी नियोजन ; सुमारे ४० मिरवणुका, प्रशासन सज्ज ,

भुसावळ (प्रतिनिधी) –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शिस्त, सुरक्षितता आणि वेळेचे काटेकोर पालन यावर भर देत व्यापक नियोजन हाती घेतले आहे. १० एप्रिल रोजी कमल गणपती हॉल येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

व्यासपीठावर भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (तालुका), राहुल वाघ (बाजारपेठ), उध्दव डमाळे (शहर), सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे (नशिराबाद) तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले, नगर पालिकेचे वैभव पवार , अग्निशमन दलाचे गजू जावळे याचबरोबर पंचायत समिती, एसटी डेपो तर्फे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती

यंदा शहरातील विविध भागांतून सुमारे ४० मिरवणुका, शोभायात्रा आणि मोटारसायकल रॅली निघणार असून उत्सव उत्साहात पण नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून २० अधिकारी, २०० पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी मार्गदर्शन करताना वेळेचे बंधन, निश्चित मार्गाचे पालन आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण या तीन प्रमुख बाबींवर विशेष भर दिला. डीजे व बँड चालकांनी आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात, लेझर लाईट्सचा वापर टाळावा, तसेच प्रत्येक मंडळाने १० ते २० स्वयंसेवक नेमून मिरवणुकीतील शिस्त राखावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी उशिरा सुरुवात झाल्याने अनेक मंडळांना पुतळ्यापर्यंत पोहोचता आले नव्हते; यंदा मिरवणुका सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच सुरू करण्याचे नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले.

बैठकीस जयंती समितीचे अध्यक्ष सोनू नेतकर, कामगार नेते जगन सोनवणे, बाळा मोरे, बाळा पवार, गणेश सपकाळे, रवींद्र निकम, प्रा. प्रशांत नरवाडे, राजश्री सुरवाडे, श्रीकांत वानखेडे यांच्यासह सुमारे २७५ ते ३०० पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावरील खड्डे, पथदिवे व पिण्याच्या पाण्याच्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

दरम्यान, १२, १३ व १४ एप्रिल रोजी आंबेडकर पुतळा परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसस्थानक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच १४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला असून त्या दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

उत्सवाच्या काळात शहरात सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर राहणार असून सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. यंदाच्या मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषण टाळून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या सामाजिक देखाव्यांवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील सलोखा, शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.