भुसावळात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जल्लोषाचे वातावरण ; अनुयायी व प्रशासन सज्ज:

भुसावळ (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात उत्सवाचा महापूर येणार आहे. शहर आणि बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत मिळून शहरातील विविध भागातून एकूण ३९ सार्वजनिक मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात रोषणाई आणि सुशोभिकरण केले जात आहे.तर या महासोहळ्यासाठी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

शहर झाले निळेमय :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात गेल्या आठवड्यापासून उत्साह जाणवत आहे. शहरात सर्वत्र रोषणाई केली आहे, निळे मोठे झेंडे लावले आहे. विजेच्या प्रत्येक खांबावर निळे झेंडे व रोषणाई केली आहे. सर्व शहर झेंडे, रोषणाईने झगमगत असून जुन्या पालिकेच्या इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सुध्दा सुशोभिकरण केले जात आहे. शहरातील मिरवणूका पार पाडण्यासाठी प्रत्येक मिरवणुकीला पोलिस, होमगार्ड यांची नियुक्ती बंदोबस्तासाठी केली जाते. मिरवणूक मार्गावरील मदिना मशीद आणि इतर प्रार्थनास्थळांजवळ विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून सर्व मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणूक संपवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

शहरातील विविध भागातून मिरवणुकांचे नियोजन

मंगळवारी संध्याकाळी विविध भागांतून मिरवणुका निघतील. शहर पोलीस हद्दीत २५ मिरवणुका निघतील, ज्यात राहुलनगर (आर.एन. ग्रुप), धम्म नगर, महात्मा फुले नगर, कंडारीसह विविध भागातील मंडळांचा समावेश आहे. विशेषतः कंडारी येथील जेतवन बौद्ध विहार आणि नागसेन कॉलनीच्या मिरवणुकीत मोठी गर्दी अपेक्षित असल्याने तिथे अधिक पोलीस तैनात असतात.

संध्याकाळी मिरवणुकांना होणार सुरुवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातील विविध भागातून निघणाऱ्या मिरवणुका या संध्याकाळी ४ वाजेपासून सुरू होतात, शहरातील विविध भागातून मिरवणुकांना सुरूवात होते, त्या मिरवणुका शहरातील मुख्य मार्गाने निघता दुसरीकडे बाजारपेठ पोलीस हद्दीतून १४ मिरवणुका काढल्या जाणार आहे. पंचशील नगर, गौतम नगर आणि यशोधरा नगर येथील मिरवणुका मुख्य बाजारपेठ, पांडुरंग टॉकीज आणि बस स्टैंड मार्गे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विसर्जित होतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पालिकेच्या जुन्या इमारतीसमोरील पुतळ्याजवळ अभिवादन करतात. आलेल्या मिरवणुकींचा समारोप संध्याकाळपासून काढण्यात रात्री १२ वाजता होतो. यात मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र येतात.

१३ एप्रिल रात्री बारापासूनच अभिवादन

डॉ. बाबासाहेब अबिडकर जयंतीनिमित्त सोमवार १३ रोजी रात्री १२ वाजेपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होत असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील बहूसंख्य भाविक हे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावरूनच पुतळ्याकडे जात असतात. रात्रि १२ पासून पुतळा परिसरात गर्दी होत असते. यावेळी समिती सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात.

बसस्थानकाचे होणार स्थलांतर

या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बसस्थानक सोमवारी रात्रीपासून पंधरा बंगला परिसरातील एसटी डेपोत स्थलांतरित करण्यात येणार असून, सर्व बससेवा तेथूनच सुरू राहतील.यावल जळगाव, रावेर, संभाजी नगर, मुक्ताईनगरस विविध भागात जाणाऱ्या बस या डेपोतूनच सोडल्या जाणार आहे.

पोलिस प्रशासनाचे आवाहन

जयंती उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, सर्वांनी पोलिसानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कुठल्या मंडळात कोणी वाद करत असतील तर त्यां नाव पोलिसांना सांगावे असे आवाहन केदार बारबोले, डीवायएसपी, भुसावळ यांनी केले आहे.