शहर विकासाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत “भुसावळात जनआक्रोश मोर्चा”

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहराच्या विकासाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता “भुसावळ जनआक्रोश मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे. गांधी पुतळा, यावल नाका येथून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

“ना राजकारणासाठी, ना स्वार्थासाठी; हा लढा फक्त भुसावळच्या विकासासाठी” या भूमिकेतून हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. शहरातील स्मशानभूमी, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, दिव्यांग कल्याण, घरकुल योजना, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सुविधा अशा जनहिताच्या मुद्द्यांवर वारंवार विरोध होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ हून अधिक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये स्मशानभूमी व कब्रस्तानातील सुविधा, मृतदेहासाठी शौवपेटी खरेदी, शहरातील स्मारकांची दुरुस्ती, संसर्गजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय, दिव्यांगांसाठी राखीव निधी वितरण, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी, पाणीपुरवठा सुधारणा, जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीनेटर बसवणे, उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना, स्वच्छता अभियानांची अंमलबजावणी, तसेच शहरातील रस्ते, सिग्नल, सार्वजनिक शौचालये आणि इतर नागरी सुविधांचा समावेश आहे.

याशिवाय, शहरातील डम्पिंग साईटवर आधुनिक सुविधा उभारणे, चौकांचे सुशोभीकरण, अल्पसंख्याक समाजासाठी सभागृह, कब्रस्तान दुरुस्ती, तसेच विविध भागांमध्ये बूस्टर पंप आणि पाइपलाइन टाकण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) माजी आमदार संतोषभाऊ चौधरी आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात नागरिक, युवक, महिला, व्यापारी, कामगार, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“भुसावळ शहरातील ५०० पेक्षा अधिक विकासकामांना विरोध का केला जात आहे?” असा सवाल उपस्थित करत, “विकासाला विरोध करणाऱ्यांना जनता उत्तर देईल,” असा इशाराही आयोजकांनी दिला आहे.

मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर काही काळ परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.