बीसारा लेडीज इक्वॅलिटी रन २०२६ साठी भुसावळच्या डॉ. अर्चना काबरा यांची सदिच्छादूत म्हणून निवड”


भुसावळ (प्रतिनिधी ) – महिलांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि समानतेचा संदेश पोहोचविण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे ‘बीसारा लेडीज इक्वॅलिटी रन २०२६’ या धावस्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १२ एप्रिल रोजी रेल्वे क्रीडांगण, भुसावळ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३, ५ आणि १० किलोमीटर अशा विविध गटांमध्ये महिलांना सहभागी होता येणार असून, ५ व १० किलोमीटर गट टाइम्ड रन स्वरूपात होणार आहेत.
या स्पर्धेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून, नोंदणी प्रक्रिया लवकरच बंद होणार असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमासाठी डॉ. अर्चना काबरा यांची स्पर्धेच्या सदिच्छादूत (इव्हेंट अॅम्बेसेडर) म्हणून निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. काबरा या आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख
४१ वर्षीय डॉ. अर्चना काबरा या गेल्या १५ वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ होमिओपॅथ म्हणून कार्यरत आहेत. मानसोपचाराच्या रुग्णांना होमिओपॅथी उपचार देणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील त्या एकमेव तज्ज्ञ म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्या सध्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, जळगाव येथे सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या मुंबई विभाग प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्या १२ वर्षांच्या मुलाच्या आणि ९ वर्षांच्या मुलीच्या आई असून, पत्नी, सून, मुलगी आणि बहीण अशा सर्व भूमिका समर्थपणे पार पाडत आहेत. सोशल मीडियावरही त्या फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून सक्रिय आहेत.
आरोग्य समस्यांमधून उभा राहिलेला धावण्याचा प्रवास
दोन गर्भधारणांनंतर वजन वाढल्यामुळे डॉ. काबरा यांना उच्च रक्तदाब आणि बॉर्डरलाइन डायबेटीस यांसारख्या समस्या जाणवू लागल्या. यानंतर वयाच्या ३३व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि फिटनेसकडे गांभीर्याने वळण्याचा निर्णय घेतला. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ३५ किलो वजन कमी केले.
याच काळात अधूनमधून धावण्यास सुरुवात झाली. पुढे २०२२ मध्ये त्यांनी धावण्याला अधिक गांभीर्याने स्वीकारले. त्याआधीच २०२१ मध्ये खान्देश रनमध्ये पहिल्याच १० किलोमीटर स्पर्धेत पोडियम फिनिश मिळवत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली होती.
१० किमीपासून कॉम्रेड्सपर्यंतचा जिद्दीचा प्रवास
यानंतर २०२२ मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर अंतर पूर्ण करत त्यांनी मोठी झेप घेतली. त्यांची पहिली फुल मॅरेथॉन टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ मध्ये मध्ये झाली आणि त्यांनी ती ५ तास २७ मिनिटांत पूर्ण केली. लडाख हाफ मॅरेथॉन २०२२ हा त्यांच्यासाठी विशेष अनुभव ठरला. २०२२, २०२३ आणि २०२४ या कालावधीत त्यांनी अनेक हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.
त्यानंतर त्यांनी जगप्रसिद्ध 90 किलोमीटरची दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करण्याचे स्वप्न साकार केले.
त्यांनी ११ तास ३८ मिनिटे २७ सेकंदांत कॉम्रेड्स पूर्ण करत जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाचा नवा आदर्श निर्माण केला.
भुसावळ येथील लेडीज इक्वॅलिटी रन २०२६ ही केवळ धावस्पर्धा नसून महिलांमध्ये आरोग्य, आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि समानतेची जाणीव निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. डॉ. अर्चना काबरा यांच्यासारख्या जिद्दी आणि प्रेरक व्यक्तिमत्त्वाची साथ लाभल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे समन्वयिका द्वय डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी म्हटले आहे व या प्रवासात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.