भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक ३० मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत तालुका विधी सेवा समिती भुसावळ यांच्या वतीने गांधी नगर, धमशील विहार (रिंग रोड, भुसावळ) येथे जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध विहार येथे बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पॅरालीगल व्हॉलंटिअर सौं. संगीता ताई राजेंद्र भामरे (अधिकार मित्र) यांनी तालुका विधी सेवा समिती व त्यांचे कार्य माहिती प्रस्तावनेत विषद केली. त्यानंतर अॅड. मेने यांनी जागतिक जल दिवस, जलसंधारण व जलसंवर्धन, प्रदूषणाचा अधिकार (मोफत पाणी व हवा), अन्न व शिक्षणाचा अधिकार, ड्रग्जविरोधी जनजागृती व निरोगी जीवनशैली, तसेच बालविवाह मुक्त भारत या विषयांवर सविस्तर व सोप्या भाषेत कायदेशीर मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानातील महत्त्वाच्या कलमांवर प्रकाश टाकत नागरिकांचे हक्क व त्यांचे फायदे याबाबत माहिती दिली. उपस्थित नागरिकांनीही विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. विशेषतः महिलांनी आपल्या अडचणी मांडत मार्गदर्शन घेतले तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) यांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच पत्रकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सौं. शर्मिला भारते, सौ. अनुसया सोनावणे, सौं. आशा सावदेकर, सुजाता सोनावणे, वैशाली ताई तसेच रवींद्र कांबळे, राजेंद्र तायडे, अशोक सोनावणे, गौतम साळवे, पंडित साळवे, अशोक पवार, सर्जेराव म्हस्के, विष्णू शेजवळ, सपकाळे दादा, संजय सावदेकर यांचेसह गांधी नगर परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमा दरम्यान रवींद्र कांबळे व राजेंद्र तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अशा विधी सेवा शिबिरांचे अधिक आयोजन करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी सौं. संगीता ताई भामरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


