शालार्थ आयडी घोटाळा: शिक्षण क्षेत्रावर भ्रष्टाचाराची छाया, प्रामाणिक शिक्षकांची प्रतिमा धोक्यात – प्र .ह .दलाल:

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघडकीस येत असून, विशेषतः शालार्थ आयडी संदर्भातील घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. हजारो कोटींच्या या कथित गैरव्यवहारामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राची प्रतिमा मलिन होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही शिक्षण संस्था चालकांनी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कृत्रिमरित्या वाढवून दाखवली. पटसंख्या वाढविल्यानंतर शिक्षकांची संख्या वाढते आणि त्याद्वारे शासनाकडून अधिक निधी मिळतो. याशिवाय पोषण आहार योजनांमधूनही आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. या प्रक्रियेत शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या सहभागाचाही संशय व्यक्त केला जात आहे.

नियमांनुसार दरवर्षी ऑगस्ट अखेरीस शिक्षण विभागातील अधिकारी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करतात. त्यामुळे या प्रकारातील अनियमितता त्यांच्या निदर्शनास आली नसावी, असे म्हणणे अवघड असल्याचे जाणकारांचे मत आहे. उलट, काही ठिकाणी मूक संमतीनेच हे प्रकार घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या घोटाळ्यामुळे लाखो प्रामाणिक शिक्षक आणि संस्था चालक यांची प्रतिमा धोक्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमधील व्यापक प्रसिद्धीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रावरच संशयाची छाया पडत असून, समाजात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी नकारात्मक भावना निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांना वेगळे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, निरपराध आणि प्रामाणिक शिक्षकांची बदनामी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शिक्षकांनीही कोणत्याही परिस्थितीत खोटी माहिती देणे किंवा अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे आचरण शुद्ध असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

“हे व्रत कठीण असले तरी अशक्य नाही. भावी पिढी घडविण्यासाठी प्रामाणिकपणाशिवाय पर्याय नाही,” असे मत प्र. ह. दलाल यांनी व्यक्त केले आहे.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी कडक कारवाईसह नैतिकतेचे भान जपणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.