शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न अधिवेशनात; आमदार अमोलभाऊ जावळे यांची तातडीच्या मदतीची मागणी

फैजपूर : सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. वादळी पाऊस, गारपीट आणि जमीन खरडल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अधिवेशनात त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना प्रश्न विचारत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

मे, जून आणि जुलै २०२३ दरम्यान झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे रावेर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाच्या पंचनाम्यानुसार केळी, कापूस, ज्वारीसह विविध पिकांचे नुकसान झाले असून मोठ्या क्षेत्रावरील शेती बाधित झाली आहे.

या नैसर्गिक आपत्तीनंतरही अनेक प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर न झाल्यामुळे सुमारे ३०९४ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिल्याचे आमदार जावळे यांनी अधिवेशनात सांगितले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे अंतिम अहवाल तातडीने सादर करून शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या प्रश्नामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.