भुसावळ प्रतिनिधी : धुळे जिल्हा अनुसूचित जाती पडताळणी समितीने गायत्री भांगळे-गोर यांचे अनुसूचित जातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी आता ११ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने विविध कायदेशीर मुद्द्यांवर बाजू मांडण्यात आली. प्रकरणाच्या अनुषंगाने सविस्तर युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित केली आहे. यापूर्वीही या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने काही निर्देश दिले होते. आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून प्रकरणातील विविध मुद्द्यांचा सविस्तर विचार करण्यासाठी ११ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. संजीव देशपांडे, अॅड. राहुल तायडे आणि अॅड. वसंत भामरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. पुढील सुनावणीदरम्यान प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर अधिक सविस्तर युक्तिवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची भूमिका काय राहते, याकडे संबंधित राजकीय तसेच कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.


