नाशिक : आगामी कुंभमेळा निर्विघ्न व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय संत समितीतर्फे ४ आणि ५ एप्रिल रोजी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात राष्ट्रीय संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या संमेलनात कुंभमेळ्याशी संबंधित १३ आखाड्यांमधील प्रत्येक आखाड्याचे दोन प्रतिनिधी, देशभरातील १२७ संप्रदायांचे संत तसेच प्रत्येक राज्यातून पाच ते दहा संत असे एकूण तीनशेहून अधिक संत उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय एकता आणि अखंडता हे या संमेलनातील प्रमुख विषय असतील. संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
नाशिक ही तपोभूमी आणि रामभूमी असून यंदाचा कुंभमेळा हा सर्वाधिक कालावधी चालणारा असल्याचे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सांगितले. त्यामुळे कुंभमेळ्याचे सुयोग्य आणि यशस्वी आयोजन कसे करावे यावर या परिषदेत विशेष चर्चा होणार आहे.
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांमुळे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे परिणाम भारतावरही होत आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत संतांची जबाबदारी अधिक वाढली आहे. देशासमोरील विविध समस्या तसेच देशाची एकता आणि अखंडता या विषयांवरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
या संमेलनापूर्वी ३ एप्रिल रोजी गंगा महासभा समिती नाशिकला येऊन गोदावरी नदीच्या पाण्याची तपासणी करणार आहे. गोदावरी शुद्धीकरणासाठी कोणते उपाय करता येतील याबाबत समिती आपल्या अहवालात सूचना देणार आहे.
पर्यावरणाच्या मुद्द्यावरून कुंभमेळ्याला लक्ष्य केले जात असल्याचा उल्लेख करत स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सांगितले की, तपोवनातील झाडे हटवली नाहीत तर साधू-संतांच्या निवासाची व्यवस्था कशी होणार, हा प्रश्न आहे. पर्यावरणप्रेमींनी साधू-संतांविषयी आदराची भावना ठेवावी. तपोवनातील झाडे हटवून त्याच्या दुप्पट झाडे इतरत्र लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पुढील १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारने आताच सुमारे १५०० एकर जमीन खरेदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी आचार्य तुषार भोसले आणि नगरसेवक कैलास मुदलीयार उपस्थित होते.


