भुसावळ ( प्रतिनिधी) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर 24 हून अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्वच स्थानकांसह भुसावळ स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

संपूर्ण भुसावळ विभाग स्थानिक पोलिस प्रशासन व गुप्तचर यंत्रणांशी सतत संपर्क ठेवून माहितीचे आदानप्रदान आणि जलद प्रतिसाद सुनिश्चित करत आहे. सर्व रेल्वे कर्मचार्यांना सतर्क राहण्याचे तसेच कुठलीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू दिसल्यास तात्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले
सर्व स्टेशनवरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवून 24 तास निरीक्षण केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलीस आणि वाणिज्य विभागातील कर्मचारी यांना विशेषपणे सूचना देण्यात आल्या आहेत की, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू ओळखाव्यात, तत्काळ संबंधित निरीक्षकांना माहिती द्यावी. मुख्य स्टेशनवर श्वान पथक सतत सज्ज ठेवण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म, यार्ड, सर्क्युलेटिंग क्षेत्र तसेच महत्त्वाच्या ठिकाणी अँटी-सॅबोटेज पथकांची तैनाती वाढविण्यात आली आहे. संयुक्त पथकांकडून विशेषतः रात्रीच्या वेळी आणि एकाकी भागात सघन गस्त घालण्यात येत आहे. बॉम्ब शोध पथके सज्ज ठेवली असून आकस्मिक तपासणीसाठी कार्यरत आहेत.
प्रवाशांना सतर्क राहण्यासाठी आवाहन करणार्या उदघोषणा व जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहेत. संवेदनशील ठिकाणी प्रवेश नियंत्रण कडक करण्यात आले असून हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रमुख स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वरिष्ठ अधिकार्यांकडून व्यक्तिगतरीत्या पाहणी केली जात आहे. कोणतीही आकस्मिक घटना घडल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आपत्कालीन पथके सदैव सज्ज आहेत. सुरक्षा नियंत्रण कक्ष सतत क्षेत्रातील पथकांशी संपर्कात राहून जलद समन्वय राखत आहेत.
प्रवाशांनी सुरक्षा तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा कर्मचार्यांना सहकार्वे करावे तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती, न ओळखलेले सामान किंवा विचित्र हालचाल दिसल्यास त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


