जेव्हा यावलच्या सरस्वती विद्या मंदिरात भरते पालकांची शाळा…….प्रार्थना, मधली सुट्टी, खाऊचा डबा, बरच काही…


यावल, ता. १३ (प्रतिनिधी ) – : आपल्या पाल्यांना घडविण्यासाठी येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी चक्क पालकांची शाळा भरली होती. यावेळी पालकांनी विद्यार्थी म्हणून भुमिका पार पाडली तर तज्ज्ञ व्यक्ती शिक्षक झाल्या होत्या. यात प्रार्थना, मधील सुट्टी, खाऊचा डबा, तास संपल्याची घंटा आदी सर्व गोष्टी होत्या.
तुमच्या पालकांची एक दिवसाची शाळा भरणार आहे. याची कल्पना पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रवेश अर्ज मागविण्यात आले.‌ आपल्या लाडक्या लेकरासाठी एक दिवस काढा असे आवाहन करण्यात आले होते. विषयानुसार वेळा पत्रक तयार करण्यात आले होते. घरुनच पाण्याची बाटली, खाऊचा डबा, वही पेन आणायला सांगितला होता. या आगळ्यावेगळ्या उपक्रमा विषयी पालकांमध्ये उत्सुकता होती. सकाळ पासुनच पालक शाळेत येण्यास सुरुवात झाली. शाळा भरण्याची घंटा झाली. प्रार्थना होऊन पहिला तास सुरू झाला. सक्षम कौन्सेलिंगच्या संचालिका आरती चौधरी यांनी पहिला तास ‘समतोल पालकत्व’ या विषयाचा घेतला. त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या मुलांच्या कले प्रमाणे व आवडीप्रमाणे त्यांना फुलु द्या. अति शिस्त व अति स्वातंत्र्य हे केव्हाही घातकच याची जाणीव ठेवा. तर आयुर्वेदाचार्य डॉ. राहुल पांडे यांनी ‘मुलांचा आहार व विहार’ या विषयावर दुसरा तास घेतला. ते म्हणाले की खाण्याच्या बाबतीत जबरदस्ती करणे टाळावे. आहार मनोअनुकुल असावा. आहार हा नेहमी समतोल असावा. जेवढी तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे. मिठाचा अतिवापर हा मुले चिडचिड होण्यास कारणीभूत ठरतो. तर बालरोग तज्ज्ञ डॉ. नीलिमा नेहेते यांनी ‘स्क्रीन टाईम वर नियंत्रण’ या विषयावर तिसरा तास घेतला. त्या म्हणाल्या ही किशोरवयापर्यंत मुलांना स्मार्टफोन देऊ नये. स्क्रीन अति वापरण्याचे शारीरिक मानसिक व शैक्षणिक तोटे आहेत. मान, पाठ, मनगट, बोटे या सगळ्यांचे दुखणे सुरू होते. मुलांची विचार करण्याची क्षमता संपते. एकाग्रता होऊ शकत नाही. समाजात मिसळण्याची गरजच वाटत नाही. प्रेरणादायी वक्ते एजाज शेख यांनी ‘मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात पालकांची भूमिका’ या विषयावर चौथा तास घेतला ते म्हणाले की मुलंही कोळ्या रोपट्यासारखे असतात त्यांना योग्य प्रकारे हाताळले जाणे आवश्यक असते. मुलां समोर ओरडून, चिडून बोलणे टाळावे मूल हे निरीक्षण करत असतात. त्यांच्याशी प्रेमाने वागावे चुकले तर समजून सांगा. त्यांना वेळ देणे महत्त्वाचे आहे. घरात निकोप वातावरण ठेवावे. मोकळेपणाने बोलावे. मुलांच्या सुप्त क्षमता विकसित होऊ द्या. त्यांच्या पातळीवर वरील निर्णय त्यांना स्वतःला घेऊ द्या. त्यामुळे निर्णय क्षमता वाढते सकारात्मक मानसिकता घरात असणे तेव्हाही चांगलं असे असे ते म्हणाले. एस. बी. चंदनकार यांनी पालकांकडून ध्यान व प्राणायाम करून घेतले.मुख्याध्यापक एस. एम. जोशी यांनी प्रास्ताविक केले. मोनिका गाजरे, निलिमा पाटील, अमोल शिंदे यांनी विषय शिक्षकांचा परीचय करून दिला. भुषण वैद्य यांनी सुत्रसंचलन केले. एन. डी. भारुडे यांनी आभार मानले.
यावेळी व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी उपाध्यक्ष श्रीकांत सरा संचालक व माजी मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी व पालक वर्ग उपस्थित होते सर्वांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.