संत परंपरेतील परंपरा अखंड सुरू – संत मुक्ताई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर व सोपानदेवांना राखी अर्पण –


मुक्ताईनगर प्रतिनिधी
रक्षाबंधन हा केवळ बहीण-भावाच्या रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, तो प्रेम, स्नेह, संरक्षण आणि निष्ठेच्या बंधनाचा उत्सव आहे. पराक्रम, साहस, संयम आणि आत्मीयतेचा संगम असलेल्या या पवित्र सणाला संत परंपरेतही एक वेगळे आणि अलौकिक रूप आहे.

मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताईबाई संस्थानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज या तिन्ही दैवी भावंडांना राखी अर्पण करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ज्या पवित्र भावबंधातून मुक्ताबाईने आपल्या भावंडांवर प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला, त्याच भावनेची जपणूक आजही संस्थान करीत आहे.

रक्षाबंधन निमित्त त्र्यंबकेश्वर येथे संत मुक्ताई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री संदीप दादा पाटील यांच्या पुढाकाराने हा सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. प्रमुख पुजारी ह.भ.प. जयवंत महाराज गोसावी, डॉ. बी.एस. पाटील, ह.भ.प. अमोल अप्पा महाराज, वेदांशु पाटील, अभिषेक पवार तसेच त्र्यंबकेश्वर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा झाला. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री सम्राट पाटील, ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प. सागर महाराज लहुडकर, संत ज्ञानेश्वर महाराज समितीचे विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळा प्रमुख श्री भावार्थ देखणे आणि व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

या दोन्ही पवित्र स्थळी मुक्ताबाईच्या भावंडांना राखी अर्पण करताना जणू भक्तिभाव, प्रेम, आणि परंपरेचे धागे एकत्र गुंफले गेले. बहिणीचे प्रेम हे फक्त देहाच्या नात्यापुरते नसून, आत्म्याच्या पातळीवरही बंध निर्माण करते, याची ही दिव्य आठवण संत परंपरेतून आजही आपल्याला मिळते. मुक्ताबाईच्या या अमर प्रेमबंधनानेच रक्षाबंधनाला खऱ्या अर्थाने संतांच्या आशीर्वादाचा आणि अध्यात्मिक बंधाचा सण बनवले आहे.

“७५० वर्षांपासून भाऊ-बहिणीचे हे अतूट नाते आजही जपले जात आहे. वारकरी भक्तांसाठी हा सोहळा अत्यंत विशेष असून, त्यासाठी श्री संत मुक्ताई संस्थानचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि वारकरी नेहमीच प्रयत्नशील असतात,” असे श्री संदीप रविंद्र पाटील यांनी सांगितले