भुसावळ (प्रतिनिधी ) : विविध मागण्यांसाठी भुसावळातील डीआरएम कार्यालयाबाहेर सेंट्रल रेल्वे मजदूर संघ भुसावळ मंडलातर्फे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेनच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी संध्याकाळी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व मुख्यालय व्हा.प्रेसीडेंट व्ही.के.समाधीया, मंडल सचिव एस.बी.पाटील, आणि मंडल अध्यक्ष मो. इरफान यांनी केले. बुधवारी सायंकाळी सहा वाजता भुसावळ रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडून सुरू झालेला मोर्चा डीआरएम कार्यालयाच्या गेटवर येऊन मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. धरणे आंदोलनादरम्यान मंडल सचिव (वर्कशॉप) किशोर कोलते, मंडल समन्वयक ए.के.तिवारी, मंडल कोषाध्यक्ष एस. के. दुबे, तसेच महिला मंडल अध्यक्षा अलका चौधरी यांनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे चक्का जामचा इशारा देण्यात आला. आंदोलकांनी सरकारला ठणकावून सांगितले की, कर्मचार्यांचे हक्क नाकारले गेले तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. यावेळी धरणे आंदोलतान विविध शाखांचे सचिव,अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कामगारांचे वेतन व भत्ते वेळेवर द्यावेत, नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता असावी, कामगार हक्कांचे संरक्षण व्हावे, खाजगीकरणाच्या धोरणांना विरोध केला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढील टप्प्यात रेल्वे चक्का जाम आंदोलन राबवले जाईल, असा इशारा सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे देण्यात आला.



