जळगाव – राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी त्यामुळे नुकसानही झाले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी येथे शेतात काम करीत असलेल्या प्रमोद मणिराम नागपुरे (वय 45) व मनीषा भारत पुष्पतोडे (वय 27) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला.

झाडाखालील झोपडीत पावसापासून बचावासाठी हे दोघे आले आणि अचानक या ठिकाणी वीज कोसळली.
महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट झाली. पिकांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये वीट भट्ट्यांचे मोठे नुकसान झाले.
वाशिम जिल्ह्यात बाजारपेठेतील हळद पावसात भिजल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात द्राक्षे व कांद्याचे नुकसान झाले.
नंदुरबारलगतच्या खांडबारा तालुक्यातील ठाणे पाडा व गंगापूर परिसरात कांदा, मका व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाच्या निरीक्षणानुसार या अवकाळीने ठाणे पाडा व गंगापूर परिसरात एकूण 378 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 577 शेतकर्यांचे नुकसान झाले.
अवकाळीचे संकट कायम
अवकाळी पावसाचे संकट अद्यापही कायम असून हवामान खात्याकडून शनिवारीही राज्यातील जळगावसह 5 जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट कायम ठेवण्यात आला होता.


