जळगाव – चांदीचे पायल खरेदी करायचे आहेत, ते दाखवा, असे दुकानदाराला सांगीतले. पायल पाहण्याचे नाटक केले. हळुच प्लास्टीक डबीत ठेवलेले 20 ग्रॅम वजनाचे सुमारे दीड लाख किमतीचे लहान मुलांचे सोन्याचे पॅन्डल घेत या महिला पसार झाल्या. ही घटना मंगळवार,28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील बालाजीपेठेत गोयल ज्वेलर्स दुकानात घडली.
विश्वनाथ हनुमानदासजी अग्रवाल (69, रा. लॉट नं.191, बालाजीपेठ सराफ बाजार) यांचे गोयल ज्वेलर्स नावाने सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन बुरखाधारी महिलांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. चांदीचे पायल दिखाव, असे सांगत त्यांनी खरेदीचे नाटक केले. ग्राहक म्हणून आलेल्या महिलांना दुकानात विविध चांदीच्या पैंजण (पायल) त्यांनी दाखविल्या. दुकानात बाजुलाच एका प्लास्टीक डबीत 1 लाख 45 लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे लहान मुलांच्या गळ्यात घालण्याचे एक व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओमपान (पॅन्डल) चोरुन नेले.

दरम्यान महिला दुकानातून पसार झाल्यानंतर पँडलची डबी न दिसल्याने मालकाने शोध घेतला असता पँडल डबी चोरुन नेल्याची खात्री झाली. या प्रकरणी विश्वनाथ अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार बुधवार, 29 रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन संशयित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक साजीद मुन्सरी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.


