वढोदा- मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथील सातपुडा जगंलाच्या पायथ्याशी असलेल्या मच्छिन्द्रनाथ महाराज मंदिरात धर्मनाथ बीजेचा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामुळे दर्शनार्थ पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
जळगाव जिल्हा व मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या वढोदा गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील सातपुडा जगंलाच्या पायथ्याशी असलेल्या मच्छिन्द्रनाथ महाराज मंदिरात दरवर्षी धर्मनाथ बीज सोहळा उत्साहाने साजरा केला जातो. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा 31 जानेवारी रोजी धर्मनाथ बीज सोहळा साजरा होणार असून धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांची दर्शनार्थ मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशा या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. महाप्रसादासाठी किमान 40 पोते गहू, ज्वारी, डाळ गावातून देणगी स्वरूपात जमा केले जाते. यासाठी समस्त गावकरी मंडळी उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करतात. तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरविली जात असल्याने मुक्ताईनगर व बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव – जामोद बस आगारातून भाविकांसाठी जादा बसेस सोडले जातात. तर या सोहळ्यासाठी मंदिराचे अध्यक्ष रवींद्र खिरोळकर व कार्यकारणी मंडळ परिश्रम घेत आहेत.



