प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनास तूर्तास स्थगिती…परिसरात स्वच्छता न राखल्यास पुन्हा आंदोलन पुकारणार :

भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने सार्वजनिक वापराच्या सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन न केल्याने श्रीनगर परिसरातील खुल्या भूखंडावर घाण साचली, दलदल निर्माण झाली. अनेक वर्षांपासून नागरिक याबाबतीत तक्रार करीत होते. नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर नगरपरिषद भुसावळतर्फे सार्वजनिक वापराचे सांडपाणी तात्पुरते वळविण्यात आले. नागरिक या कार्यवाहीवर समाधानी नव्हते.

जिल्हाधिकारी लक्ष घालणार…
गुरुवारी संध्याकाळी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. राजेंद्र फातले व उपमुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, स्वच्छता विभाग व बांधकाम विभाग अधिकारी व इतर यांनी पाहणी केली. स्थळ परीक्षण केल्यानंतर उपाययोजना तात्पुरती झाली आहे हे अधिकाऱ्यांनी मान्य केले. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांच्या या समस्येचे निराकरण करण्यात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच दलदलीचा पूर्ण भाग त्यावरील पाणी सुकल्यानंतर येत्या १५ ते २० दिवसात स्वच्छ करण्याचे तसेच परिसरात वाहून येणाऱ्या दोन्ही गटारीची दररोज स्वच्छता कर्मचारी स्वच्छता राखतील असे आश्वासन भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. राजेंद्र फातले यांनी दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी २०२५ होणाऱ्या आंदोलनास काही दिवसांसाठी स्थगिती दिली आहे

परिसरात स्वच्छता न राखल्यास आंदोलन पुन्हा पुकारण्यात येईल…
प्रत्येक महिन्यातून दोन ते तीन वेळेस याठिकाणी आरोग्य प्रशासनांतर्फे औषध फवारणी झाली पाहिजे, परिसरात नियमित स्वच्छता राखली गेली पाहिजे. भूखंडावरील कचरा आणि गटारीची घाण पालिकेने दररोज उचलून घ्यावी. तसेच भविष्यात या ठिकाणी पुन्हा अशी परिस्तिथी निर्माण होणार नाही यासाठी आपण कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अन्यथा स्थगित केलेले आंदोलन पुन्हा पुकारण्यात येईल असा इशारा प्रा. सीमा पाटील व नागरिकांनी दिला आहे.