पवना धरणात बुडालेल्या तरुणांवर अंत्यसंस्कार : बंगला, बोट मालकांविरोधात गुन्हा –

भुसावळ – मावळ तालुक्यातील पवना धरणात बुधवारी पाण्यात बोट उलटून भुसावळातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. बंगला व बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मयत मयूर रवींद्र भारसके (25, रा.पुणे, मूळ रा.लालजैन मंदिर पाठिमागे, पद्मावती नगर, भुसावळ) याच्यावर खडका येथे गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर तुषार रवींद्र अहिरे (26, सध्या रा.पुणे, मूळ रा.लालजैन मंदिर पाठिमागे, पद्मावती नगर, भुसावळ) याच्यावर शुक्रवारी सकाळी भुसावळातील तापी तिरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे भुसावळ शहरातील रहिवासी तुषार अहिरे आणि मयूर भारसाके हे मित्रांसोबत मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये फिरायला आल्यानंतर पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात ‘लेक इस्केप व्हिला’ या बंगल्यात ते थांबले होते. बंगला पवना जलाशयाच्या बॅक वॉटरला लागूनच आहे. तेथूनच थेट धरणामध्ये उतरण्यासाठी रस्ता आहे. जलाशयामध्ये सुमती व्हिवा यांची एक बोटदेखील होती. तुषार अहिरे, मयूर भारसाके त्यांचा मित्र बोट घेऊन पाण्यामध्ये गेले होते. बोट उलटून तुषार आणि मयूर हे पाण्यात पडले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मयत तुषार अहिरे याच्या नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून बंगला, बोट मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.