भुसावळ:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटनांवर पाळत ठेवली जात आहे. याशिवाय रेल्वे आणि स्थानकांवर आरपीएफ जवानांकडून गस्त वाढविण्यात आली असून, रेल्वे गाड्यांमधील प्रत्येक कोच, डब्यात सुरक्षा बलाचे जवान २४ तास गस्त घालून प्रवाशांना सुरक्षित, आनंदी प्रवास घडविण्यास मदत करीत आहेत. दरम्यान, सणासुदीच्या गर्दीत, सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रयत्न करीत आहे. दिवाळी सणामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या प्रत्येक गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रत्येक मेल, एक्स्प्रेस, डेमू, पॅसेंजर गाड्यांना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी दिसून येत आहे. वाढत्या गर्दीत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अहोरात्र काम करीत आहेत. दरम्यान, रेल्वेच्या आवारात कोणतेही संशयास्पद पदार्थ आढळल्यास किंवा संशयित व्यक्ती आढळून आल्यास १३९ या हेल्पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सामान आणि प्रवाशांची नियमित तपासणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडे असलेले सामान व प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय स्थानक व गाड्यांमधील अनोळखी वस्तूंवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अपघात आणि गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने आरपीएफ पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्यंतरी भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफ जवानांकडून खुन करून फरार होत असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते, याशिवाय स्कॅनर मशीन वर गांजा ही जप्त करण्यात आला होता. सातत्याने कारवाया सुरूच आहे प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन कोणतेही फटाके, ज्वलनशील वस्तू किंवा संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती गाड्यांमध्ये किंवा स्थानकांवर आढळल्यास आरपीएफ, जीआरपी कर्मचारी किंवा रेल्वे अधिकाऱ्यांना त्वरित कळवा. मौल्यवान वस्तू जवळ आणि नजरेसमोर ठेवा,प्रवासात सुरक्षिततेसाठी डिजिटल पेमेंट निवडा. मुले प्रौढांसोबत असतात याची खात्री करा. घोषणांकडे लक्ष द्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा



