भुसावळ – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा-भुसावळतर्फे , नको फटाक्याची वात,लाऊ विवेकाची ज्योत यासाठी प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करन्याचे आवाहन करण्यात आले आहे .
शासन निर्णय क्र.इएनव्ही-2010/प्र.क्र.106/ता.क., मंत्रालय, मुंबई दि.3 मे 2011 या शासन निर्णयानुसार कोणत्याही धर्मांच्या सणांचे साजरीकरण विशेषतः सार्वजनिक स्तरावर होणारे सणांचे साजरीकरण हे जनसमुदायाला नवचैतन्य देणारे असावे.जाणते अजाणतेपणी काही वेळा अशा साजरीकरणातून निसर्गाच्या जल,हवा,
ध्वनी या प्रमुख घटकांचे प्रदुषण मानवी समाजासाठी हानीकारक ठरत असते.
फटाके फोडल्यानंतर होणारे प्रदुषण हे दरवर्षी प्रदुषण नियंत्रण मंडळ मोजत असते.ते निश्चितच चिंताजनक असते.फटाक्यांपासून कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर डाय ऑक्साइड,टार पार्टीकल्स फाॅस्फरसचे आॅक्साईड या सारखे विषारी वायू बाहेर पडतात.त्यातील काही घटक कार्सिनोजेनीक म्हणजे कर्करोग निर्माण करणेस कारणीभूत असतात.काहींपासून फुफ्फुसांचे,हृदयांचे आजार होतात.पक्षी, गुरेढोरे, काही छोटे प्राणी यांच्या जीवनमानात बदल होऊन त्यांची संख्या कमी होत चालली आहे.जैवविविधतेचे नुकसान दिसत आहे.हवा आणि जल यांचे प्रदुषण होतेच होते,
शिवाय ध्वनिप्रदूषण हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते.काहींना ह्रदय रोगांचे आजार असल्यास त्यांना अटॅक येण्याची शक्यता असते.विशेषत: लहान बाळांना ध्वनिप्रदूषणापासून लांब ठेवावे लागते.ह्या वर्षी शासनाने ध्वनिप्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे.त्याचे महा अंनिसने स्वागत केले आहे.
शिवाय फटाके निर्मितीच्या कारखान्यात लहान मुले(बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे) तसेच बायकांना देखील काम करावे लागते.त्यांचे शोषण होतेच होते.कधीकधी फटाक्यांच्या कारखान्यात आग लागते, तेव्हा अपघातात मुलांचा,बायकांचा समावेश असतो,हे वेगळे सांगायला नको.८० डेसीबलपेक्षा मोठ्या आवाजाच्या फटाके निर्मितीस या वर्षी बंदीचे आदेश दिले आहेत.



