सर्वात पहिले वारकरी भगवान देवाधिदेव महादेवतुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष मोरे महाराजांचे प्रतिपादन


भुसावळ प्रतिनिधी – महाराष्ट्राला वारीची हजारो वर्षांची परंपरा आहे असे सांगितले जाते, हजार ते 900 वर्षाचा लिखित इतिहास आहे, मात्र त्याहीपूर्वी देवकाळात सर्वात प्रथम वारी कोणी केली असेल तर ते देवांचे देव महादेव यांनी केली आहे, असे प्रतिपादन तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी केले.
श्री.मोरे हे येथील विठ्ठल मंदिर वार्डमध्ये “ वारी पंढरीची , तुमच्या आमच्या मनात वसलेल्या पांडुरंगाची “ ह्या विषयावर आयोजित कार्यक्रमात विवेचन करत होते. मंदिर संस्थांच्या वतीने हभप भरत महाराज बेळीकर व संस्थांचे अध्यक्ष सुहास फालक यांनी महाराजांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. तत्पूर्वी महाराजांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत आरती केली गेली. महाराज पुढे म्हणाले की, देशावर व धर्मावर जेव्हा राष्ट्रवादाची वादळे घोंगावत असतात तेव्हा कीर्तन व भक्तीतून योग्य मार्ग दिसत असतो. वारीचे महात्मे सांगताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात प्रत्येकाची कुलदेवता जरी वेगवेगळी असली तरी घराघरांमध्ये वारीचे धार्मिक अधिष्ठान आहे कारण प्रत्येकाचं विठ्ठल हे प्राणप्रिय दैवत आहे. आपल्या इष्टदेवतेचे पुन्हा पुन्हा नामस्मरण पुन्हा पुन्हा दर्शन म्हणजेच वारी होय. संत तुकारामांनी चौदाशे टाळकरी घेऊन वैयक्तिक वारीला सुरुवात केली 1685 संत ज्ञानोबांची पालखी निघाली. दरवर्षी सुमारे 23 लाखांच्या वर वारकरी आपला सहभाग नोंदवत असतात. वारीमध्ये जातीभेद, पंथभेद नाही एकमेकांमध्ये देव पाहिला जातो ती खरी वारी मानवता हा सर्वात मोठा धर्म मानणारी वारी आहे. कारण मनाची शुद्धता म्हणजेच वारी होय, असे प्रतिपादन श्री.मोरे यांनी केले. वारीत येणार्‍या अडचणी त्यांचे समाधान भक्ती आणि त्यांची शक्ती या विषयावर सुमारे तासभर विवेचन केले गेले. प्रसंगी महिलांची संख्या मोठी होती शहरात नाहाटा महाविद्यालय व मातृभूमी चौकासह विठ्ठल मंदिरात अशा तीन ठिकाणी एकाच दिवशी महाराजांच्या या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दिली.

चौकट
वारीमध्ये देखील घुसखोरी
घुसखोरी हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने घेतला जात असला तरी वारी सारख्या पवित्र ठिकाणी देखील काही लोकांची घुसखोरी होत असल्याचे दिसून आलेले आहे. आपल्या वारीमध्ये काही वेगळ्या विचारांची लोकं त्यामध्ये सहभागी होतात व आपल्या भोळ्या भाबड्या वारकर्‍यांना फुस लावणे, प्रलोभन देण्याचे कार्य करतानाचे सिद्ध झालेले आहे. ते आपल्या वारकर्‍यांना सांगतात तुम्हाला आम्ही शिक्षणासाठी पैसे देवू, घरासाठी पैसे देवू, अन्नासाठी पैसे देवू, तुमचं शिक्षण केलं जाईल, अशा वेगवेगळ्या प्रलोभना त्यांना देऊन त्यांना आपल्या धर्मात घेण्याचे पातक या वारीमध्ये केले जात असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध झालं पाहिजे, तसेच कदाचित ३००० वर्ष जुना वारीचा इतिहास पुसणे हा उद्देश असावा , असंही श्री.मोरे महाराज यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक सांगितले