भुसावळ: – येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय पाच दिवसीय शारदा उत्सव संपन्न झाला .या महोत्सवात विविध स्पर्धा ,रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम ,प्रा .जयेंद्र लेकुरवाळे यांचे स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर उद्बोधन असे अनेकविध कार्यक्रम पार पडले . आज या महोत्सवाचा समारोप भव्य दिव्य विसर्जन मिरवणुकीने झाला.


सदर विसर्जन मिरवणुकीत सुरुवातीला अश्वारूढ अहिल्यादेवी व झाशीची राणी यांच्या स्वरूपातल्या विद्यार्थिनी होत्या तदनंतर डीजेच्या तालावर एक संघपणे ठेका घेणाऱ्या लहान लहान विद्यार्थिनींचे झेंडा पथक होते ,या मिरवणुकीत गरबा पथक यांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले

.यावर्षीच्या शारदा उत्सवामध्ये देवीसमोर’ नारी तू नारायणी’ अशी महिला सशक्तीकरणाच्या संदर्भात आरास केली होती ,याला अनुसरून शाळेतील विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून अत्याचार झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे, गुन्हेगाराला शासन केले पाहिजे असा संदेश देणारे नाट्य मुलींकडून सादर करण्यात आले . सदर पथनाट्याने सर्व भुसावळकरांचे लक्ष वेधले . त्याचबरोबर नऊवारी पातळ भगवा फेटा परिधान करून मराठमोळ्या रूपामध्ये झांज पथक व लेझीम पथक यांचे सादरीकरण अत्यंत सुंदर झाले. शाळेपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक जामनेर रोड, गंगाराम प्लॉट , डिस्को टावर, मरी माता चौफुली कडून विठ्ठल मंदिराजवळ समारोप करण्यात आला. सदर मिरवणुकीत विद्यालयातील साधारणत: 850 विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या पथकामध्ये समावेश होता. सदर मिरवणुकीचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांनी श्रीफळ वाढवून केले. मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



