गोमाता झाली आता राज्यमाता !राज्य सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्र ठरले दुसरे राज्य

मुंबई,

राज्य सरकारने आज सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.

गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने दि. 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. अशातच आता महाराष्ट्र सरकारनेही गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. सेंद्रिय शेतीमध्येही गाय महत्त्वाची मानली जाते. तिच्या गोमूत्राचा वापर शेतीमध्ये केला जातो, जो पिकांसाठी फायदेशीर आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने गाईला मातेचा दर्जा दिला आहे. या निर्णयाचे राज्यातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे.

आयुर्वेद, पंचगव्य चिकित्सा पद्धतीत महत्त्व

राज्य सरकारने काढलेल्या आदेशात गाईचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि पंचगव्य उपचारात गायीचे योगदान अमूल्य मानले जाते. गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही यांचा समावेश असलेली पंचगव्य पद्धत विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय सेंद्रिय शेतीमध्येही गोमूत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

हिंदू धर्मात गायीला विशेष स्थान आहे. तिला मातेचा दर्जा देण्यात आला असून धार्मिक विधींमध्ये तिची पूजा केली जाते. गोमूत्र आणि शेण पवित्र मानले जाते. तसेच ते विविध धार्मिक समारंभात वापरले जाते. गाईचे दूध केवळ शारीरिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. भारतात गायीचा नेहमीच आदर केला जातो. वैदिक काळापासून आजपर्यंत गायीकडे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिले जाते. गाईमध्ये देवी-देवता वास करतात असे मानले जाते. म्हणून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे.