मुक्ताईनगर पंचायत समितीला मंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ठोकले कुलूप -गटविकास अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप : कामे होत नसल्याने मंत्री संतप्त

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीत विविध योजनांची कामे होत नसल्याने व गटविकास अधिकार्‍यांसह त्यांच्या अखत्यारीतील यंत्रणा पैसे घेतल्याशिवाय कामे करीत नसल्याने संतप्त केंद्रीय क्रीडा व युवा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी मिनी मंत्रालयाला कुलूप ठोकले. या प्रकाराने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. आंदोलन पवित्रा तसेच मंत्री खडसेंच्या आरोपानंतर गटविकास अधिकारी निशा जाधव यांचा बीपी वाढल्याने त्या खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या तर वरिष्ठ यंत्रणेकडून मंत्री रक्षा खडसेंची भेट घेण्यात आली मात्र त्या मागणीवर ठाम राहिल्या.

आढावा बैठकीत मंत्री खडसे संतप्त
मुक्ताईनगर पंचायत समितीत मंगळवार, 24 रोजी क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीला घरकुल तसेच गोठा आदी प्रकरणे पाठवली जातात मात्र ठरावातील घरकुल वा गोठा प्रकरण मंजूर न करता पैसे घेवून वेगळी प्रकरणे मंजूर होत असल्याच्या तक्रारी मंत्री खडसे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी निशा जाधव यांना जाब विचारत संताप व्यक्त केला.

गटविकास अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा आरोप
पंचायत समितीत गटविकास अधिकार्‍यांसह त्यांच्या हाताखालील यंत्रणा पैशांचे वजन ठेवल्याशिवाय कामे करीत नसल्याचा आरोप मंत्री खडसे यांनी करीत त्यांना धारेवर धरले. दरमहा बैठक होणे क्रमप्राप्त असताना ती होत नाही शिवाय लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही व केवळ पैसे देणार्‍यांची कामे होत असल्याने गटविकास अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांची तडकाफडकी बदली करावी, अशी मागणी करीत मंत्री रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या दालनाला कुलूप ठोकले.

यांची होती उपस्थिती
आंदोलनप्रसंगी केंद्रीय मंत्री खासदार रक्षा खडसे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, तालुका सरचिटणीस विनोद पाटील, तालुका सरचिटणीस अंकुश चौधरी, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सावळे, मोहन महाजन सरपंच, सरपंच सपना संदीप खिरोडकर, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोण पैसे घेते सिद्ध करावे : गटविकास अधिकारी
गटविकास अधिकारी निशा जाधव यांच्याशी ‘तरुण भारत’ने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मंत्री रक्षा खडसे यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. आपल्याकडे येणारी सर्व कामे आपण करतो व कुणा एकाचीही त्याबाबत लेखी तक्रार नाही मात्र मी वा अन्य कुणी पैसे मागत असल्यास मंत्री खडसे यांनी ते सिद्ध करावे. या प्रकारामुळे बीपी वाढल्याने आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्या म्हणाल्या.