भुसावळ ः जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात कमाल कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाकडून निर्मित महाडीबीटी पोर्टलकडून जिल्ह्यातील विविध योजनांसंबंधीच्या अर्जदारांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा आहे. यामुळे शेतकरी अवजारांची खरेदी टाळत आहेत.

सूक्ष्मसिंचन, अवजारे, मल्चींग, फळबागा व इतर योजनांबाबत जिल्ह्यातील 10 हजारांवर शेतकऱ्यांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा आहे. या शेतकऱ्यांना अर्ज सादर केल्यानंतर सोडत किंवा लॉटरीमध्ये समावेश झाल्याचे संदेश आहे. यानंतर शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासंबंधी आवश्यक कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केली आहे. ही कार्यवाही अनेकांनी 20 मार्च 2024 म्हणजे 7 महिन्यांपूर्वी केली आहे. तर काहींनी 8 महिन्यांपूर्वी कागदपत्र अपलोड केले आहेत. परंतु अद्यापही पूर्वसंमती आलेली नाही. यामुळे शेतकरी योजनेतून अवजारे, सूक्ष्मसिंचन यंत्रणा किंवा इतर बांबींची खरेदी टाळत आहेत. पूर्वसंमतीच नसल्याने खरेदी करून काय करणार, एेनवेळी शासनाने पूर्वसंमतीस नकार दिल्यास नुकसान होईल, वित्तीय बोजा वाढेल, अशी भीती शेतकरी उपस्थित करीत आहेत.
त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभाग, शासनाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
पूर्वसंमती महाडीबीटीने न दिल्याने शेतकरी संबंधित अवजारांची खऱेदी टाळत आहेत. परिणामी शेती व्यवस्थापनात अडचणी येत आहेत. यातून शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत आहे. अनेकांनी शेती अवजारे खरेदी केलेली नाही. यामुळे भाडेतत्त्वावर अवजारे घेवून आपल्या शेतीची पूर्वमशागत, आंतरमशागत करावी लागत आहे. योजनांचा लाभ वेळेत मिळत नसल्याने त्यांचा उपयोग काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ना. गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील इतर आमदारांनी याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून योजना आली अडचणीत ; शेतकरी संकटात
महाडीबीटी विभागाकडून एक वर्षापूर्वी पंधरा दिवसानंतर ट्रॅक्टर मालकांसाठी लॉट काढून ट्रॉली , नांगर, रोटाव्हीटर , मळणी यंत्र , कुट्टी कटर ,थ्रेशर अशी विविध वस्तू मिळत होत्या . मात्र गेल्या वर्षापासून या योजनेत अनियमितता दिसून येत आहे . ही लॉटरी पुणे येथून काढण्यात येत असल्याचे समजते.


